नविन लेख

Human Right | अहिल्यानगर मनपा प्रशासनाचे, ‘कळी खुडण्याचे’ पाप

ग्यानबाची मेख | ०२ एप्रिल | भैरवनाथ वाकळे

(Human Right) शहराचे कौतुक असलेल्या एकमेव उड्डाणपुलाच्या खांबावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील विविध प्रसंग चितारले आहेत. लाखो रूपये खर्चून स्थानिक कलाकारांना डावलत थेट पुण्यामुंबईचे लोक आणून हे कार्य आमदार-खासदार यांनी केले. शिवरायांच्या ‘कार्याचा आदर्श’ यातून पिढीने घ्यावा, असे संकेत यामागे असावेत असे आधी वाचले होते. ‘नव्याचे नऊ दिवस’ संपल्यावर शिवचित्रांची व शिवरायांच्या मुळ विचार आणि धोरणांची काय अवस्था आहे हे अहमदनगरकर (अहिल्यानगरकर) रोज पहात आहेत. शिवविचारांना धुळ चारण्याचे कार्य पुढारी राजरोस करीत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळी या चित्रांवर असलेल्या लाईट निम्म्याअधिक गेलेल्या आहेत. काहीतर थेट बंदचालू होत असतात. काही लोकांनी या चित्रांवर आपल्या चमकोगिरीच्या राजकीय, व्यापारी जाहिराती चिकटवल्या होत्या व आहेत. याबाबत दै. रयत समाचारने बातम्या प्रसिद्ध केल्यावर मनपा प्रशासनाने काही जाहिरातदारांवर गुन्हे दाखल केले. त्याचे पुढे काय झाले? हे समजले नाही. शिवचित्रांवर जाहिरात चिकटवणारांना कोणाचाच धाक नाही, हे मात्र यातून दिसून आले. निवडणूका संपल्यावर पुढाऱ्यांचे शिवप्रेमही संपलेले दिसून आले.

Human Right

(Human Right) स्टेटबँक चौकातून चांदणी चौकाकडे जाताना उड्डाणपुलाच्या चौथ्या खांबावर लहान लेकरांनी अनेक छोटीमोठी चित्रे काढली आहेत. काही लेकरांमधे जन्मजात कलेचा अंश आलेला असतो. लेकरे जे विचार करतात त्याचे चित्रण आपल्या आजूबाजूला करत असतात. आपण पहातो अनेक घरांमधे लहानमुले भिंतीवर पेन, खडू, पेन्सिल, स्केचपेन आदीने चित्रे काढत असतात. काहीतरी विचार करत त्याचे चित्रण करत असतात. अगदी तसेच या खांबावर सिया मोहन साहू या तीसरीतील सेंट झेव्हिअर्स शाळेतील बेघर मुलीने ही सुंदर चित्रे रेखाटली आहे़त.

Human Right

 (Human Right) आम्ही रोज सीएसआरडीला जाताना व येताना ही चित्रे पहातो. पण इतकी भारी चित्रे नक्की कोणी काढली हे समजत नव्हते. चित्रकार नक्की कोण हे कळायला मार्ग नव्हता. आज पुन्हा येताना त्या कुटुंबांच्या बुथ हॉस्पिटल कंपाऊंड भिंती लगतच्या छोट्या छोट्या झोपड्या महानगरपालिकेने अतिक्रमण म्हणून काढायला लावल्याचे दिसले. काही दिवसांपासून मनपा अधिकारी राज्यशासनाच्या रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशावरून गरीबांशी लढत आहेत. ही बेघर लहानलहान लेकरे व कुटुंबे चिंतेत दिसत होती. तेथे थांबून माहिती घेत चर्चा करत असताना दोन लेकरं तेथे आली. त्यातील एक होती बालचित्रकार सिया साहू. सेंट झेव्हिअर्स शाळेतील तीसरीच्या वर्गातील खेळकर, बोलके लेकरू काही माहिती देण्याचा प्रयत्न करत होते. खांबावरील चित्रे कोणी काढली विचारल्यावर आधी लाजून मीच असे सांगितले. नाव, गाव, वर्ग शाळा विचारल्यावर तिने सर्व माहिती दिली.

 

 या लेकराने चित्रकलेचे कुठलेही तांत्रिक ज्ञान अथवा शिक्षण घेतलेले नाही. हे लेकरू जन्मजात चित्रकार आहे. तिला शिक्षणासोबतच चित्रकलेचे प्रशिक्षण दिले तर भारतमातेला आणखी एक महान चित्रकार मिळू शकतो, हे आपण सर्वांनी ध्यानात घेतले पाहिजे. यासाठी तिला आपण सर्वांनी शैक्षणिक सहकार्य, राहण्यासाठी घराची सुरक्षित शाश्वती दिली पाहिजे.
मुळात राज्य शासनाच्या महामार्गावरील अतिक्रमणे काढणे हे महानगरपालिकेचे काम नाही. राज्यशासनाचे ओझे मनपा का वाहते हे मुळात अनाकलनिय आहे. कोणासाठी हा ‘उद्योग’ सुरू आहे हे समजत नाही. महानगरपालिका आयुक्त महाशय अतिक्रमणाच्या नावाखाली गरीबांच्या पोटावर पाय देण्याचे पाप करत आहेत, हे स्पष्ट जाणवते. शहरातील अनेक राजकीय पुढारी, आजीमाजी नगरसेवक, अनेक धनदांडगे व जातलांडगे यांची धडधडीत दिसणारी अतिक्रमणे आहेत. अनेक भुखंड तस्करांनी नागरिकांच्या हक्काच्या ओपनस्पेस म्हणजेच खुल्या जागा, नैसर्गिक वाहते ओढेनाले गिळले आहेत. अनेक आरक्षित भुखंडांवर माजी नगरसेवकांची अतिक्रमणे आहेत. मनपा आयुक्त यांच्या नावावर ७/१२ उतारे असलेले अनेक रस्ते बिल्डरांनी, गावगुंडांनी गायब केले आहेत, ज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार आयुक्तांची आहे़, त्यांच्या अंडर काम करणाऱ्या अतिक्रमणविरोधी अधिकारी यांची आहे. पण त्याकडे दूर्लक्ष करून गरीबांच्या चुली मोडण्याचे काम प्रशासकीय काळात सुरू असल्याचे दिसते. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
मुळात राज्यशासनाच्या रस्त्याकडेची गरीबांची अतिक्रमणे काढायची असल्यास मनपाने त्यांचा व्यापक सर्व्हे करावा. त्यांना मनपा हद्दीत घरकुलांचा प्रस्ताव करून त्यांना घरकुले द्यावीत. या अतिक्रमण मोहिमेमुळे शिक्षणातून बाद होण्याची शक्यता असलेल्या सिया साहू सारख्या ‘भारतमाते’ला बेघर करण्याचे तसेच कलाकाराची नवी ‘कळी खुडण्याचे’ पाप प्रशासक तथा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी करू नये. या भारतीयांची सोय करूनच रस्त्याकडेचे अतिक्रमण काढावे.Human Right

हे ही वाचा : Literature | आपण लिहा, आम्ही प्रसिध्द करू; साहित्यिकांना आवाहन

https://youtube.com/@theblackpanther1?si=kXB60p5A_1PcdWQM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× आपल्याला काही मदत पाहिजे का ?