
समाजवार्ता | ११ एप्रिल | शुभम गायकवाड
हल्ली आपण फार अपडेट आणि मॉडर्न झालो आहोत. इतके अपडेट आणि मॉडर्न झालो आहोत की, घरात असलेल्या आईवडील, आजीआजोबा यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुखमय बनवण्यात घालवले. त्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी आपल्याकडे वेळच उरलेला नाही ?
खरंतर येत्या काही दिवसांमध्ये एक पिढी हे जग सोडून जाणार आहे. हे सत्य आपल्याला स्वीकारायला हवे. त्याचबरोबर सहज मनात येऊन गेले की, आपणही एक शेवटची पिढी आहोत की, ज्यापिढीचे आई-वडील आजीआजोबा हे फेसबुकवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर नाहीत. ही पिढी म्हणजे आपल्या विचारांवरती ठाम असलेली.
अनेकदा आपण प्रवास करतो. माणसांची नुसती गर्दी व तीही चैनीच्या गोष्टी मिळवण्यासाठी रोज धावताना दिसतात. अर्थात त्यात मी ही एक.अनेकदा कोणासोबत वाद होतो, तर कधीकधी हसीमजाक करत करत हा प्रवास कधी संपतो माहीतच पडत नाही.
असाच अहमदनगर ते पुणे हा माझा त्या दिवशीचा प्रवास. धावपळ करत बसस्थानकावर पोहोचलो. डोळे रिकाम्या बाकाचा शोध घ्यायला लागले. काही वेळ निघून गेल्यानंतर पुण्याला जाणारी बस आली. बसमध्ये चढलो, जागासुद्धा मिळाली. माझ्या बाजूच्या सीटवर एक म्हातारी आजी येऊन बसल्या. या आजी म्हणजे वय वर्ष साधारण ७० ते ८० च्या वयामधील. मी फक्त त्यांचे निरीक्षण करत राहिलो.
बस सुरू होऊन स्थानकाबाहेर पडली. आपल्या मोबाईलमध्ये त्या आजीने हरिपाठ, अभंग अशा गोष्टी लावलेल्या, मोठ्या आवाजात आजी ते भजन आपल्या कानाजवळ घेऊन ऐकत होत्या. जवळजवळ एक तास आजी तुकोबांचे ज्ञानेश्वरांचे अभंग ऐकत होत्या. मोठमोठ्याने गातसुद्धा होत्या. मी सुध्दा तल्लीन होऊन ते ऐकत होतो.
अनेकदा या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःसाठी वेळ काढायला विसरून जातो किंवा आपल्याला काय हवे हे विसरून जातो. अनेकदा आपल्या सभोवताली अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्यातून आपण खूप काही शिकू शकतो, परंतु आपण तो विचारच करत नाही. कुठेतरी म्हटलेच आहे ना ‘घरात हसरे तारे असतात, मी पाहू कशाला नभाकडे.’
गावाकडे हरिपाठ, कीर्तन, भजन, सकाळची काकडआरती सहज ऐकायला मिळते. पुण्यासारख्या धावपळीच्या शहरात कीर्तन, भजन, हरिपाठ, सकाळची काकड आरती किंवा स्वतःला काय हवे, स्वतःला काय आवडते याकडे फारसे लक्ष कोणी देत नाही. परंतु आजी मात्र निराळ्याच…कदाचित माझ्या पिढीला माहीत असेल पण माझ्या पुढच्या पिढीला तर लक्षातही राहणार नाही. त्यामुळे आपण एक दुर्मिळ गोष्ट आता हरवतोय की काय असे वाटू लागले.
येणारा काळ हा नक्कीच चांगला असेल. अनेक गोष्टी सोयीस्कर आणि सोप्या होतील परंतु स्वतःसाठी आणि इतरांसाठी जगणारी ही पिढी मात्र लुप्त होणार हे तितकेच खरं. प्रयत्न करू या या पिढीकडून मिळालेला आदर्श पुढे आपण घेऊन जाऊ या. स्वतःला काय हवे. स्वतः कसे जगायला हवे. या पिढीकडून शिकूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी जीवनाचे धडे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू या.
(लेखक सीएसआरडी समाजसेवा महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत)

संपर्क : शुभम सत्यभामा रामकृष्ण गायकवाड – ८३८००२९३०२.shubhamgaykwad321@gmail.com
खूप छान लेख आहे शुभम